कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने स्थानिक विदाता प्रशिक्षण केंद्र येथे सदर प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी डी. के. चौधरी यांनी अध्यक्ष्यस्थान भूषविले. उद्घाटक म्हणून प्रकल्प विशेषज्ञ (कृषी) मिलिंद अरगडे होते. यावेळी नोडल अधिकारी विदाताचे एस. के. देशमुख, कृषी महाविद्यालय रिसोडचे प्रा. एस. बी. खोडके व शेतीशाळा समन्वयक आर. एस. घुले, प्रकल्प विशेषज्ञ मनुष्यबळ विकास विश्वजित पाथरकर, आर. ए. खिल्लारी, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नानाजी देशमुख यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर एस. के. देशमुख यांनी प्रशिक्षणाचे उद्देश व पीक परिस्थितीनुसार आवश्यक तंत्राबाबत माहिती दिली. डी. के. चौधरी यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून शिफारशित कीटकनाशके वापर व हाताळणी तसेच हवामानाच्या अंदाजाबाबतच्या समस्या मांडल्या. तांत्रिक मार्गदर्शनात मिलिंद आरगडे यांनी शेती शाळा समन्वयक व प्रशिक्षक यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या यांविषयी मार्गदर्शन केले. एकात्मिक कीड व्यवस्थापन, सुधारित वाणांचाच वापर याविषयी कृषी संशोधन केंद्रातील आर. ए. आंबेनगरे यांनी तर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर व बीज प्रक्रिया यांविषयी कृषी महाविद्यालय येथील प्रा. एस. बी. खोडके यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. शेतीशाळा समन्वयक आर. एस. घुले यांनी शेतीशाळेत सर्वेक्षण व निरीक्षणाचे महत्त्व व नोंदींबाबत सविस्तर माहिती विशद केली. उपस्थितांनी प्रशिक्षणानंतर वनोजा फार्म येथील एसआरटी प्लॉटची पाहणी केली. प्रशिक्षणास जिल्ह्यातील शेतीशाळा प्रशिक्षक उपस्थित होते. विश्वजित पाथरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर अभिषेक देशमुख यांनी आभार मानले.