वाशिम: जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत संगणकीय बदली प्रक्रि येमध्ये अर्ज करण्यास वारंवार अडथळे येत असल्याने या प्रक्रियेंतर्गत आॅनलाइन अर्ज सादर करण्यास शासनाने पुन्हा सुधारित वेळापत्रक २३ आॅक्टोबर रोजी जारी केले आहे. यानुसार वाशिम जिल्ह्यातील बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना २६ ते २८ आॅक्टोबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी राज्य शासनाने अंशत: सुधारित केलेल्या निर्णयाला काही जिल्हा परिषद शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयास स्थगिती देतानाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या २७ फेब्रुवारीच्या धोरणानुसार करण्याचे स्पष्ट आदेश दिले. न्यायालयाच्या याच आदेशानुसार बदली अधिकार प्राप्त, तसेच २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या बदली धोरणानुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या फेरीत बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व शिक्षकांना आता नव्याने सुधारीत अर्ज करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच शिक्षणाधिकाºयांमार्फत देण्यात आल्या. या प्रक्रियेसाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या निर्णयानुसार विनंती बदल्या करण्यासाठी सुधारीत अर्जांचे नमुने शासनाच्या बदली पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आणि सुुरुवातीला या प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास २३ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ११.५९ पर्यंत मुदत देण्यात आली; परंतु ओव्हरलोडमुळे हे पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने निर्धारित २३ आॅक्टोबरच्या मुदतीत शिक्षकांना आॅनलाईन अर्ज सादर करणे अशक्य झाले आणि अनेक शिक्षक अर्ज करण्यापासून वंचित होण्याची भिती निर्माण झाली. यामुळे सदर प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली. त्याचा विचार करून शासनाने या प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार अमरावती विभागातील जिल्ह्यांतील बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना २६ आॅक्टोबर ते २८ आॅक्टोबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. दरम्यान, औरंगाबाद विभागासाठी २४ आॅक्टोबर, पुणे विभागासाठी २५ आॅक्टोबर, तर नाशिक विभागासाठी २६ आॅक्टोबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
शासनाने बदली पात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्यास सुधारित वेळापत्रकानुसार २८ आॅक्टोबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी, बदली पोर्टलचा मोठ्या प्रमाणात एकाच वेळी वापर होत असल्याने त्यावर लोड वाढून ते ठप्प होत आहे. त्यामुळे या पोर्टलच्या सर्व्हरची क्षमता वाढविणेही आवश्यक आहे. -राजेश मोखडकर, सचिव, शिक्षक संघ, कारंजा.