लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १६ जानेवारी रोजी पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची निवडणूक झाली. त्यामध्ये कारंजा, मंगरुळपीर पंचायत समितीत राष्टÑवादी काँग्रेस , रिसोड , मालेगाव पंचायत समितीत जनविकास आघाडी तर वाशिम पंचायत समितीवर काँग्रेसच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. यामध्ये रिसोड व मानोरा पंचायत समितीमध्ये परिवर्तन झाले असून कारंजामध्ये महाविकास आघाडीला बहुमत असतांना राष्टÑवादी काँग्रेसने वंचित आघाडीशी हातमिळवणी करुन आपल्या पक्षाचा सभापती विराजमान केला. रिसोड व मानोरा वगळता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष प्रत्येक पंचायत समितीत सत्तेत दिसून येत आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीने दोन पंचायत समित्याचे सभापती पद पटकावले.वाशिम जिल्ह्यात सहा पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदासाठी गुरुवार १६ जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात वाशिम, मानोरा, कारंजा आणि रिसोड या चार पंचायत समित्यांतील सभापती उपसभापतींची निवड अविरोध निवड झाली. त्यात वाशिम पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या रेश्मा गायकवाड, तर उपसभापती पदी शिवसेनेच्या सविता जाधव यांची अविरोध निवड झाली. रिसोड पंचायत समितीत जनविकास आघाडीच्या गिता हरिमकर यांची सभापती पदी, तर याच आघाडीचे सुभाष खरात यांची उपसभापती पदी अविरोध निवड झाली. मानोरा पंचायत समितीतही भाजपाच्या सागर जाधव यांची सभापती पदी आणि भाजपाच्यास रुपाली राऊत यांची अविरोध निवड झाली. कारंजा पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता रोकडे यांची सभापती पदी, तर उपसभापती पदी वंचित बहुजन आघाडीचे किशोर ढाकुलकर यांची निवड झाली. त्याशिवाय मंगरुळपीर येथील पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या दिपाली इंगोले यांची सभापती अविरोध निवड झाली, तर उपसभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे हरीष महाकाळ यांनी विजय मिळविला. मालेगाव पंचायत समितीत जनविकास आघाडीच्या शोभाताई गोंडाळ यांची सभापती पदी, तर उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या सुमित्रा घोडे यांची निवड झाली.
रिसोड, मानोरा पंचायत समितीमध्ये परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 2:22 PM