लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणजे पाटणी चौक, या चौकात नेहमीच वर्दळ राहते. त्यात या रस्त्यावर चक्क फेरीवाले, भाजीवाले रस्त्यात बसून वाहतूक प्रभावित करीत आहेत. शहर वाहतूक शाखेच्यावतिने दररोज त्यांना तेथून हटविल्या जात असले तरी त्यांना तेथून कायमचे हटविण्यात अपयश येत आहे. पर्यायी या रस्त्यावर नेहमीच वाहतूक विस्कळीत होवून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.वाशिम शहरातील वाहतूक समस्या अतिशय बिकट झाली असतांना वरिष्ठांना याचे काहीही देणेघेणे दिसून येत नाही. या रस्त्यावरुन चारचाकी वाहन आल्यास संपूर्ण रस्ता बंद होतो. कारण रस्त्याच्या मधात असलेल्या डिव्हायडरच्या दोन्ही बाजुला भाजीविक्रेते, फळविक्रेत्यासह लघुव्यावसायिक चक्क रस्त्यात दुकाने टाकून बसतात. रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर वाहनांचा कर्कश हॉर्न वाजविल्या जात असतांना यांना त्याचे काहीही देणे घेणे दिसून येत नाही. त्यातल्या त्यात म्हणजे काही नागरिकही चक्क रस्त्यावर लागलेल्या दुकानातील वस्तू खरेदीसाठी मोटारसायकलवर बसून खरेदी करतांना दिसून येतात. यामुळे वाहतूक प्रभावित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावाला लागत आहे. या चौकात सतत दोन शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कर्तव्यावर असतात. ते अधून-मधून चकरा मारतात तेव्हा त्यांचे कोणी काहीच ऐकून घेतांना दिसून येत नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात वाहतूक शाखा अपयशी ठरत असतांना वरिष्ठ अधिकारी मात्र यावर काहीच उपाय योजना का करतांना दिसून येत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी रस्त्यावर पार्कींग होवू नये यासाठी दोन्ही बाजुला पांढºया रंगाचे पट्टे मारण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी कोणीही प्रयत्न करतांना दिसून येत नाही.
वाशिम शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात वाहतूक शाखा अपयशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:41 PM