वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी होत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना श्वास घेण्यास त्रास, भूक मंदावणे, कमी एकू येेणे आदी त्रास जाणवत आहे. कोरोनातून बरे झालेल्यांना जिल्ह्यातील पोस्ट कोविड सेंटरमध्ये उपचार, समुपदेशन व सल्ला देण्यात येत आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख प्रचंड घसरला आहे. त्यामुळे दिलासादायक चित्र आहे. दुसरीकडे कोरोनातून बरे झालेल्यांना पायऱ्या चढताना दम लागणे, कमी एकू येणे, भूक मंदावणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे, फुफ्फस पूर्ण क्षमतेने काम न करणे आदी त्रास जाणवत आहे. या रुग्णांना जिल्ह्यातील ३३ पोस्ट कोविड सेंटर येथे उपचार तसेच समुपदेशन करण्यात येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या आहारावर भर द्यावा, कोणते व्यायाम करावे, कोणती दक्षता घ्यावी यासह समुपदेशन करण्यासाठी पोस्ट कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डाॅक्टर आहेत. या पोस्ट कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ६० ते ८० रुग्ण येऊन गेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुण्यालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय यासह जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पोस्ट कोविड सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भूक मंदावणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पायऱ्या चढताना त्रास होणे अशी लक्षणे असणारे रुग्ण येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकजण व्यायामावर भर देत आहेत. वातावरणात बदल होत असल्यानेही कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला, दम लागणे आदी लक्षणे जाणवत आहेत. गत दोन महिन्यात जवळपास ५० ते ६० जणांना अशी लक्षणे आढळून आली आहेत.
कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, भूक मंदावणे, आदी लक्षणे जाणवत आहेत. या रुग्णांवर उपचार तसेच समुपदेशन होण्यासाठी पोस्ट कोविड सेंटरची व्यवस्था आहेत. येथे उपचार करण्यात येतात.- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी