लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात सुरू असलेल्या वृक्षारोपण मोहिमेमध्ये शासकीय यंत्रणांसह अनेक स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन वृक्षारोपण करीत आहेत. त्यांनी केलेल्या वृक्षारोपणाची नोंद घेण्यासाठी वन विभागाने ‘माय प्लांट्स’ हे ‘अॅप’ तयार केले आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच केलेल्या वृक्षारोपणाची नोंद या ‘अॅप’च्या सहायाने करण्याचे आवाहन सहायक वन संरक्षक आर. बी. गवई यांनी केले आहे.‘माय प्लांट्स’ हे अॅप प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येईल. हे अॅप वापरण्याची पद्धती अतिशय सोपी व सुटसुटीत आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर ज्या ठिकाणी वृक्षलागवड केली आहे, त्या स्थळावरून व्यक्ती, संस्थेचे नाव, मोबाइल क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव, वृक्षारोपण स्थळाचा पत्ता, लागवडीत सहभागी झालेल्या लोकांची संख्या, लागवड केलेल्या रोपांची संख्या आदी माहिती भरावी. त्यानंतर अॅपवर उपलब्ध असलेल्या पयार्याच्या सहाय्याने वृक्षारोपणस्थळाचे छायाचित्र घेऊन अपलोड करावे. हे छायाचित्र वृक्षारोपण स्थळाच्या अक्षांश, रेखांश माहितीसह अपलोड होऊन वृक्षारोपणविषयक माहितीची नोंद पूर्ण होईल. अॅप वापरताना काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी वन विभागाच्या (०७२५२-२३५५८८) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गवई यांनी केले आहे.
‘माय प्लांट्स अॅप’द्वारे वृक्षारोपणाची नोंदणी!
By admin | Published: July 05, 2017 1:11 AM