वाशिम - लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण, देखभाल व संगोपन योग्यरित्या होण्यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोग्य विभागाच्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय बैठकांमध्ये यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाशी संबंधित विषय हा विषयसूचीमध्ये समाविष्ठ केला जाणार आहे. तशा सूचनाही सार्वजनिक आरोग्य विभागाने २७ जून रोजी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यात वृक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या पृष्ठभूमीवर राज्यात गत चार वर्षांपासून वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात आली आहे. ‘हरित महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत सन २०१७ ते २०१९ या कालावधीत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, सन २०१७ मध्ये चार कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली. सन २०१८ मध्ये १३ कोटी आणि २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच वृक्ष संगोपनही होण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय बैठकांमध्ये वृक्ष लागवड व संगोपन या संदर्भातील विषय हा प्रत्येक बैठकीच्यावेळी विषयसूचीमध्ये स्थायी विषय म्हणून समाविष्ठ केला जाणार आहे. प्रत्येक बैठकीत वृक्ष लागवडीचा आढावा, यापूर्वी लावलेल्या झाडांचे जीवंत राहण्याचे प्रमाण, मृत झाडांच्या जागी नवीन झाडांची लागवड, पुढील वर्षांमध्ये वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्षारोपणासाठी स्थळ निश्चिती, रोपांची उपलब्धता, आवश्यक त्या तांत्रिक पद्धतीने खड्डे तयार करणे, निधीची उपलब्धता आदीसंदर्भात पूर्व यातरीबाबत आढावा घ्यावा लागणार आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत झालेल्या निर्णयांची नोंद बैठकीच्या इतिवृत्तामध्ये करावी लागणार आहे. क्षेत्रीय कामांना भेटी देतेवेळी त्या-त्या विभागांतर्गत वृक्ष लागवडीच्या स्थळांना भेटी द्याव्या लागणार आहेत तसेच झाडांचे संरक्षण योग्यरितीने होते की नाही, मृत झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावली की नाही, पाण्याची व्यवस्था व संरक्षणासाठी मनुष्यबळ आदी बाबींची वरिष्ठ अधिकाºयांना पाहणी करावी लागणार आहे.
वृक्ष लागवड व संगोपन या विषयासंदर्भात शासन व आरोग्य विभागाच्या निर्देश, सुचनांनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व सहकाºयांच्या सहकार्यातून नियोजन केले जाईल. त्य अनुषंगाने अंमलबजावणीची दिशा ठरविली जाईल.- डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम