लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डाबाजार (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभागाकडून उंबर्डाबाजार ते मनभा, दोनद या आठ किमी अंतराच्या मार्गावर विविध प्रजातींची जवळपास आठ हजार झाडे लावण्यात आली. मात्र, पाण्याअभावी अनेक झाडे कोमेजून जात असल्याने वृक्ष संवर्धन मोहिमेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी मोठा गाजावाजा करून विविध शासकीय तथा निमशासकिय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. परंतु, लावलेल्या वृक्षांचे संरक्षण व संगोपन योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे लावलेली अनेक वृक्ष जीवंत राहू शकत नाही. वृक्ष लागवड मोहिमेवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो; मात्र त्या तुलनेत वृक्ष संवर्धन मोहिम फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याची बाब उंबर्डाबाजार ते दोनद या मार्गावरील कोमेजलेल्या झाडांवरून दिसून येते. सर्वेक्षण, सिमांकन, खड्डे आखणी, जागेची साफसफाई, खड्डे खोदणे, खड्ड्यासभोवताल माती भरणे, बुरशीनाशक शेणखत, कंपोष्ट खत व किटकनाशक टाकने, रोपांची खरेदी, वाहतुक, लागवड यासह अन्य कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभाग कारंजा कार्यालयाच्यावतीने उंबर्डाबाजार, मनभा, दोनद या मार्गावर वृक्ष संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे लावलेली काही झाडे जनावांनी फस्त केली आहेत तर काही झाडे पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. आठ हजार झाडांना पाणी देण्यासाठी केवळ सहा मजूर लावण्यात आले आहेत. तसेच केवळ दर्शनी भागातील झाडांनाच संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे. अन्य झाडांना कोणतेही संरक्षण कवच नसल्याने ही झाडे जगणार की नाही याबाबत साशंकता वर्तविली जात आहे. या प्रकाराकडे सामाजिक वनीकरण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमींतून होत आहे.
उंबर्डाबाजार - दोनद मार्गावरील झाडे पाण्याअभावी कोमेजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:17 PM