लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, वाहनधारकांना वळण लागावे याकरिता शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेद्वारे लाखाे रुपयांचा दंड वसूल केल्यानंतरही शहरात दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवासी वाहतूक हाेत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. वाशिम शहरातील रस्त्यांवर लघुव्यावसायिकांनी आधीच अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात वाटेल तेथे वाहन उभे करून वाहनचालक तासन्तास गायब राहत असल्याने वाहतुकीस अडथळा हाेत आहे. यात शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहराबाहेर व प्रत्येक चाैकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची माेहीम शहर वाहतूक शाखेने हाती घेतली आहे. दरराेज १००च्यावर वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. असे असतानाही शहरात व शहराबाहेर दुचाकीवरून ट्रिपलसीट प्रवास बिनधास्त वाहनचालक करताना दिसून आले. विशेष म्हणजे वाहनचालक मास्कचा वापर देखील करीत नसल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.
वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’! वाशिम शहर वाहतूक शाखेच्या वतीने दरराेज प्रत्येक पाॅइंटवरील कर्मचाऱ्यांने कमीत कमी ३० केसेस करण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याकरिता सकाळपासूनच शहराबाहेर व शहरातील प्रमुख चाैकामध्ये शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात दिसून येत आहेत. येणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबवून त्यांच्याकडील कागदपत्राची तपासणी करीत आहेत. तपासणी करताना काहीच आढळून न आल्यास हेल्मेट, मास्क नसल्याचे सांगून दंड आकारून आपले टार्गेट पूर्ण करताना दिसून येत आहेत.
रिसाेड नाका, पुसद नाक्यावर कर्मचाऱ्यांचा अभावशहरातील पाटणी चाैकासाेबतच सर्वात रहदारी व गजबजलेल्या चाैकामध्ये रिसाेड नाका, पुसद नाक्याचा समावेश आहे. परंतु पाटणी चाैकवगळता या प्रमुख चाैकांमध्ये बहुतांशवेळी कर्मचारी दिसून येत नाहीत. शिवाय पाटणी चाैकात बसत असलेल्या लघुव्यावसायिकांना उठविल्यानंतर ते रिसाेड नाका परिसरात येऊन बसतात. याकडे मात्र वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. यासाठी दंड सुध्दा आकारण्यात येत आहे. हळूहळू सुधारणा हाेत आहे. नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.-नागेश माेहाेड, शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम