नंदकिशोर नारे,वाशिम : परस्पर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक आणि महिंद्रा सुप्रो या वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी महिंद्रा सुप्रो या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना मानोरा-कारंजा मार्गावर गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी विठोली येथील गजानन वामनराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार एम. एच.२७ बीएक्स ४२३० क्रमांकाचा ट्रक इण्डेन गॅसचे रिफील घेऊन कारंजा येथून मानोराकडे येत होता, तर एम. एच. ३७ टी. २५८५ क्रमांकाचे महिंद्रा सुप्रो वाहन मानोरा येथून कारंजाकडे जात होते. या दोन्ही वाहनांची कारंजा-मानोरा मार्गावरील कुपटा घाटात सकाळी १० वाजता समोरासमोर धडक झाली. अपघाताची माहिती मानोरा पोलिसांना माहित होताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघातात महिंद्रा सुप्रो या वाहनाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक चालकाविरुद्ध कलम २७९ भादंवि व मोटार व्हेईकल ॲक्ट १८४ नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले आहे.