कारंजा लाड : दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील शेवती फाट्याजवळ २८ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. सुखदेवसिंग मंगलसिंग सरदार (४७) रा. भिलाई (छत्तीसगड) व मुजीब वैजाद शेख (२६) रा. शिवगाव (ता. वैजापूर)अशी मृतकांची तर सतपाल रामशीग जरवाल (३२) रा. शिवगाव व हरपालसिंग प्यारासिंग सरदार रा. भिलाई अशी जखमींची नावे आहेत.
नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील कारंजा ते शेलुबाजार या दरम्यान अलिकडच्या काळात अपघाताच्या घटना वाढल्याचे दिसून येते. कारंजा ते शेलुबाजार या दरम्यान शेवती फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर जबर धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच कारंजा येथील गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे आरोग्य सेवक रमेश देशमुख हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अपघातग्रस्तांना मदत केली.
अपघात एवढा भिषण होता की ट्रकचा एका पूर्ण चुराडा होऊन त्या ट्रकमध्ये चालक अडकला होता. चालकाला बाहेर काढण्यासाठी रमेश देशमुख व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन तास शर्थीचे प्रयत्न केले. या अपघातात सुखदेवसिंग मंगलसिंग सरदार व मुजीब वैजाद शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर सतपाल रामशीग जरवाल व हरपालसिंग प्यारासिंग सरदार हे जखमी झाले.
ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार इंगळे, पीएसआय धनराज राठोड व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पोलीस व्हॅनद्वारे व १०८ रुग्णवाहिका या मदतीने तात्काळ कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. या कामी शेलुबाजार पोलीस व कारंजा ग्रामीण पोलीसांसह रुग्णसेवक श्याम घोडेस्वार, अमोल गोडबोले यांनी सेवा बजावली.