शिरपूर जैन (वाशिम) : डोणगाव (ता.मेहकर) येथे सुनेच्या आजारी आईला भेटण्यासाठी जात असताना, चांडस गावानजीक समोरून येणाºया भरधाव ट्रकने कारला जबर धडक दिल्याने यामध्ये कारमधील आई, वडीलासह मुलगा जागीच ठार झाल्याची घटना ५ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजतादरम्यान घडली. मूळचे सावरगाव बर्डे येथील रहिवासी तथा वाशिम येथील सिव्हील लाईन भागात राहणारे कड परिवारातील किसन ग्यानुजी कड (वडील), जिजाबाई किसन कड (आई), अमोल किसन कड (मुलगा) अशी मृतकाची नावे आहेत. अमोलच्या सासूची (पत्नीची आई) तब्येत ठिक नसल्याने किसन ग्यानुजी कड, जिजाबाई किसन कड हे मुलगा अमोल कड याच्यासोबत एम. एच. ३७ जी २०७९ क्रमांकाच्या कारने डोणगाव येथे भेटीसाठी जात होते. दरम्यान चांडस गावानजीक मेहकरवरून येणाºया आर. जे. ०४ बी.बी. ४४४७ ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या घटनेत किसन कड, जिजाबाई कड व अमोल हे जागीच ठार झाले. गावकºयांनी त्यांना कारमधून बाहेर काढले. जिजाबाई यांचा मृतदेह कारमध्ये फसल्याने तो बाहेर काढण्यासाठी सावरगाव येथील मंडळीने परिश्रम घेतले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद साठे हे घटनास्थळावर रवाना झाले. मृतक अमोलची पत्नी व मुलगा अगोदरच डोणगाव येथे गेलेले आहेत. दरम्यान, अमोल हे व्यवसायाने वाशिम येथे वकील होते. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याने कड परिवारावर शोककळा पसरली.
ट्रकची कारला धडक; आई-वडीलासह मुलगा जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:10 PM