राज्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या अनियमितेसह अतिवृष्टीचा फटका सर्वच पिकांना बसला. त्यातच तुरीचे पीक ऐन शेंगा धारणेच्या स्थितीत असताना ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे या पिकाला मोठा फटका बसला आणि उत्पादनात प्रचंड घट आली. वाशिम जिल्ह्यातही हीच स्थिती पाहायला मिळाली. अनेक शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलही तूर पिकली नाही, तर धुक्यामुळे मर रोग येऊन हजारो हेक्टर क्षेत्रातील तुरीचे उभे पीक शेंगा भरण्यापूर्वीच सुकले. आता या पिकाची काढणी पूर्ण झालेली असून, गेल्या दीड महिन्यापासून बाजारात नव्या तुरीची खरेदी होत आहे. सुरुवातीचे दोन आठवडे वगळता तुरीच्या दरात सतत वाढ होत असल्याचे जिल्ह्यातील बाजारपेठेत दिसत आहे. शासनाने तुरीला प्रति क्विंटल ६ हजार रुपयांचे हमीदर घोषित केले असताना व्यापाऱ्यांकडून त्यापेक्षा खूप अधिक दराने तुरीची खरेदी होत आहे. कारंजा बाजार समितीत गुरुवारी प्रति क्विंटल ७ हजार रुपये दराने, तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी तब्बल ७२०० रुपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी झाली.
------
विदेशातील आवकही थांबली
नैसर्गिक आपत्तीमुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचे उत्पादन घटले आहे. त्यात भारतात म्यानमार, बर्मासारख्या देशातून तुरीची मोठ्या प्रमाणात आयात होते; परंतु या देशांत अंतर्गत वाद उफाळला आहे. शिवाय मुंबई येथील बंदरावरही तुरीची आवक नाही. त्याचा परिणाम राष्ट्रीय बाजारपेठेवर होऊन तुरीच्या दरात वाढ झाल्याचे मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
---------------------
बाजारात नाममात्र आवक
जिल्ह्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. जिल्ह्यातील सर्व मुख्य बाजार समित्या आणि त्यांचे उपबाजार मिळूनही दिवसाला २० हजार क्विंटल तुरीची आवकही होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. तुरीच्या दरात सतत वाढ होत असतानाही वाशिम येथील बाजार समितीत शुक्रवारी अवघ्या २६९१ क्विंटल तुरीची आवक झाली होती.
---------------------
आठ हजारांचा टप्पा ओलांडणार
यंदा तुरीचे उत्पादन घटले असतानाच नाफेडच्या खरेदीतील तूरही आता जवळपास संपत आली आहे. गतवर्षी शासकीय खरेदी अंतर्गत घेण्यात आलेल्या ८ लाख टन तुरीपैकी केवळ १ लाख टन तूर आता शिल्लक राहिली आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी पुढेही कायम राहणार असून, तुरीचे दर प्रति क्विंटल ८ हजार रुपयांपर्यंतचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
---------------------
कोट : आंतराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात होणारी तुरीची आयात थांबली आहे. शिवाय नाफेडच्या खरेदीतील तूरही आता फारशी शिल्लक राहिली नसून, राज्यात तुरीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे तुरीच्या दरात मोठी तेजी आली आहे. पुढेही ही तेजी कायम राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
- आनंद चरखा,
अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम
---------------------
कोट : नैसर्गिक आपत्तीने खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या आशा तूर पिकावर असताना ढगाळ वातावरण, धुक्यामुळे या पिकाचेही नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट आली. आम्हाला सुमारे चार एकर क्षेत्रात अवघे साडेचार क्विंटल उत्पादन झाले. त्यामुळे पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही.
- जगदीश आरेकर,
शेतकरी, इंझोरी
-------
बाजारातील तुरीचे प्रति क्विंटल दर
तालुका दर
वाशिम ७२००
कारंजा ७०००
मानोरा ६७००
रिसोड ६६००
मं.पीर ६५००