गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत पात्र लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी गत तीन वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन, स्वच्छ भारत मिशनतर्फे व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. लोककलावंत, कलापथकांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमही घेण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजारांवर शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झालेला आहे; परंतु अनेक गावात परिस्थिती जैसे थे झाली आहे. शौचालय असूनही त्याचा नियमित वापर होत नाही. हगणदारीमुक्त झालेल्या अनेक गावात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी जिल्हा स्वच्छता मिशनच्या कक्षाला दिले. शौचालयाच्या १०० टक्के वापरासाठी जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिल्या. गुड मॉर्निंग पथकावर अधिक भर देण्यात येणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचा यामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा आणि संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी केले.
उघड्यावरील ‘शौच’वारीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:40 AM