वाशिम: क्षयरोग दिनाच्या औचित्यावर २४ मार्च रोजी कारंजा तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यावतीने क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. या अंतर्गत पोहा, उंबर्डा बाजार आणि महागावसह इतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची रॅलीही काढण्यात आली.
क्षयरोग दिनाच्या औचित्यावर क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाभरात जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाला २३ मार्चपासून सुरुवात झाली असून, ३१ मार्चपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शुक्रवारी कारंजा तालुक्यातील मनभा आणि कामरगाव येथे शाळा, मदरशात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, तर २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्यावर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पोहा येथे विद्यार्थ्यांची रॅली काढून क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात क्षयरोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात क्षयरोग आजाराबाबत पोहाचे सरपंच डॉ. एस. एस. दहातोंडे, उपसरपंच ललिता तायडे, पोहा प्राथमिक आरोग्य केंद्रोच वैद्यकीय अधिकारी डॉ. बल्लाड, आरोग्य सेविका बुधनेर, आरोग्य सेवकपदलमवार, तसेच आशासेविका योगिता जाधव यांनी क्षयरोगाबाबत माहिती देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. दरम्यान, तालुक्यातील महागांव आणि उंबर्डा बाजार येथेही आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांची रॅलीही काढण्यात आली.