लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्यशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत गट ग्रामपंचायत टनका येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत संप पुकारला असून, गावातील मंदिरासमोर ठिय्या मांडला आहे. त्याची सुरुवात म्हणून दैनंदिन शहरात येणारे शेकडो लिटर दूध आज गावातच वाटून देण्यात आले. शासन जोपर्यंत मागण्या मान्य करित नाही, तोपर्यंत संप कायम राहील, असा निर्धार गावकऱ्यांनी बोलून दाखविला आहे.शासनाच्या मनमानी कारभाराविरूद्ध संपूर्ण राज्यभरातील शेतकरी संपावर जाण्याची भूमिका घेत आहेत. वाशिम तालुक्यातील टनका येथील शेतकऱ्यांनी देखिल १ जुन पासुन गावातील मंदीरासमोर ठिय्या आंदोलन करून संपास जाहीर पाठींबा दर्शविला आहे. टनका, सोनगव्हान आणि झोडगा ग्रामपंचायतीने ३१ मे च्या ग्रामसभेत स्वीकृत केलेल्या ठरावानुसार ३१ मे रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुषंगाने आज सकाळपासूनच दैनंदिन कामावर जाणारे शेतकरी गावातच ठिय्या मांडून बसले. सदर गावे पैनगंगा नदीच्या तीरावर वसल्याने येथे मासेमारी, दुग्धव्यवसाय व उन्हाळी भाजीपाला उत्पादन घेतले जाते. भाजीपाला, मासे व शेकडो लिटर दूध अनसिंग, कन्हेरगाव नाका आणि वाशिम जिल्ह्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जाते; परंतु आज कुठल्याच प्रकारचा शेतमाल बाजारपेठत न पाठविता शेकडो लीटर दूधदेखील गावातच मोफत वाटून देण्यात आले, उर्वरित दुधाची रात्री घोटाई करण्याचा निर्धार करण्यात आला. या संपामुळे दैनंदिन दुधाचा उकडा असलेल्या कुटुंबाना, हॉटेल्सला ताजे दूध न मिळाल्याने त्यांची धावपळ झाली. शेतकऱ्यांनी भुईमूगदेखील आज विक्रीसाठी बाजारपेठेत येऊ न दिल्याने बाजारपेठतही शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्या तत्काळ पूर्ण कराव्यात; अन्यथा वस्तूविनिमय पद्धतीची पुनरावृत्ती होऊन शेतकरी आपल्या गरजा गावातच पूर्ण करण्यासाठी समायोजन करेल, अशी प्रतिक्रिया संपामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी दिली. सदर संपामध्ये गावातील शंकर कालापाड, कैलास इंगळे, विनोद गव्हाणे, हरिभाऊ गव्हाणे, गणेश शिंदे, देवराव हाटकर, रामचंद्र मस्के, गुनाजी धनगर, भीमराव इंंगळे, साहेबराव धवसे, विजय मार्कड, अंबादास फाडे, किशोर धवसे, सागर शिंदे, कुंडलीक मोरे, दिलीप इंगोले, सुरेश इंगोले, बाबुराव शिंदे आदी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
टनका येथील शेतकऱ्यांनी पुकारला बेमुदत संप!
By admin | Published: June 02, 2017 1:33 AM