लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/रिसोड : गत तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे. रिसोड तालुक्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील हळद व मक्याची झाडे करपली असून, अन्य तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.सिंचनाची सुविधा उपलब्ध असणारे जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा या पारंपारिक पिकांबरोबरच हळद, मका व भाजीपालावर्गीय पिकेही घेतात. जिल्ह्यात दोन हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर हळद लागवड झालेली आहे. रिसोड तालुक्यात वाकद परिसर, मालेगाव तालुक्यात शिरपूर परिसरात हळदीचे लागवड क्षेत्र अधिक आहे. रब्बी हंगमात मका पीक देखील घेतले जाते. साधारणत: गत आठवड्यापर्यंत पोषक हवामान असल्याने हळद व मका या दोन्ही पिकांना ‘अच्छे दिन’ होते. परंतू, शनिवार, २९ डिसेंबरपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका या पिकांना जबर फटका बसला आहे. वाकद भाग दोनमधील हळद पिक दोन दिवसात करपून गेले आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हतबल झाले असून, कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी होत आहे. रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील शेतकरी बळीराम कुल्हाळ यांच्या शेतातील खरबूज पीकही थंडीमुळे उद्धवस्त होत आहे. कुल्हाळ यांनी आधुनिक पद्धतीने शेतीची कास करून प्लास्टिक आच्छादनावर हे पीक घेतले होते. परंतु गत तीन दिवसात थंडीचा कडाका वाढल्यामुळे हे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. सदर पिकासाठी त्यांनी एकलासपूर धरणावरून पाईपलाईन सुद्धा केलेली आहे. वाकद तसेच एकलासपूर परिसरात शेडनेटमधील मिरची तसेच सिमला मिरची यासारखी पिके सुद्धा कोमेजून गेली आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक शेतकºयांचे वांगे, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसला आहे. आणखी दोन ते तीन दिवस थंडीचे प्रमाण असेच राहिले तर हळद, मका यासह भाजीपालावर्गीय पिके संपूर्णत: हातातून जाण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. वाकद येथील शेतकरी विजय जटाळे यांनी शेडनेटमध्ये घेतलेले मिरचीचे पीक थंडीमुळे उद्धवस्त होत आहे. जटाळे यांचा हा मिरचीचा ‘बिजवाई प्लॉट’ असल्यामुळे त्यांना खूप मेहनत करावी लागली आहे. नैसर्गिक संकटामुळे मिरचीचे नुकसान होत असल्याने शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी जटाळे यांनी केली. कडाक्याच्या थंडीत मका, हळद तसेच काही भाजीपालावर्गीय पिके तग धरू शकत नाहीत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
थंडीचा हळद, मक्यासह भाजीपाला पिकांना फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 1:49 PM