वाशिम/मूंगळा : मृगबहार गळून पडल्याने मुंगळा परिसरासह जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकर्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पारंपारिक शेती परवडत नसल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. जिल्ह्यात ९00 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबाग आहे. एकट्या मुंगळा परिसरात ३00 हेक्टरवर संत्रा लागवड आहे. २८ जूननंतर १ ऑगस्टपर्यंत पावसाने दडी मारल्याने याचा फटका संत्रा उत्पादक शेतकर्यांना मोठया प्रमाणात बसला आहे. यावर्षी मृगनक्षत्रात बर्यापैकी पाऊस झाल्याने संत्रा उत्पादन समाधानकारक होईल अशी आशा शेतकर्यांना होती. मात्र ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने संत्रा बागेतील बहार गळून पडला. पावसाची दडी आणि ३५ ते ३९ सेल्सीअस तापमान यामुळे संत्र्याच्या मृगबहाराला फटका बसला. मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसर संत्रा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. या परिसरात जवळपास ३00 हेक्टरवर संत्रा फळबाग बहरली आहे. मागील एक महिन्यात पाऊस नसल्याने मृगबहाराला फटका बसला. या प्रकरणी नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुंगळा येथील जगदंबा संत्रा उत्पादक शेतकरी स्वयसहाय्यता गटाचे शेतकरी व अन्य शेतकर्यांनी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, कृषी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, आमदार अमीत झनक, आदींना यापूर्वी निवेदन दिले आहे. मात्र, यावर अद्याप काहीच कार्यवाही नसल्याने शेतकर्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी २ लाख रुपये मदत देण्याची मागणी मुंगळा येथील जगदंबा संत्रा उत्पादक शेतकरी स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष प्रकाश राऊत, माजी पं.स.सभापती उध्दवराव केळे, संत्रा उत्पादक शेतकरी आनंद नाईक, गणेश मोहळे, भागवत मोहळे, भागवत राऊत, अशोक राऊत, पिंटू राऊत, बबन भांदूर्गे, सुरेश राऊत आदींनी मंगळवारी केली.
संत्रा उत्पादक अडचणीत
By admin | Published: August 13, 2015 1:13 AM