वाशिम : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान हे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. मात्र, बारावीचे प्रॅक्टिकलच झाले नाही, बारावीला अंतर्गत गुणही नाहीत, आदींमुळे शैक्षणिक नुकसान होण्याचा सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.गतवर्षी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. यंदाही पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ३६३ शाळा आहेत. बारावी निकालाचा तिढा सोडविताना, राज्य शिक्षण मंडळाने मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर केले आहे. बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल सात सदस्य असलेली निकाल समिती स्थापन केली जाणार आहे. दरम्यान, मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाल्याने आणि बारावीचे प्रॅक्टिकल झाले नसल्याने तसेच गतवर्षी अकरावीची परीक्षादेखील झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे.
बारावीसाठी असे होणार गुणदानदहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के गुणांचा अंतर्भाव राहणार आहे.
बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?nयंदा बारावीचे प्रॅक्टिकल झाले नाही, बारावीला अंतर्गत गुणही नाहीत. त्यामुळे अंतर्गत गुणांनुसार गुणदान कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्र परीक्षा, चाचण्यादेखील ऑनलाईन झालेल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत गुण देताना तारेवरची कसरत आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान झाले आहे. प्रत्यक्षरित्या परीक्षा झाली असती, तर गुणदान प्रक्रियेत पारदर्शकता राहिली असती. दहावी आणि अकरावीतील गुण विचारात घेतले जाणार असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. अकरावीची परीक्षाच झाली नसल्याने गुणदान कसे होणार, हा प्रश्नच आहे. बारावीचे गुण कमी मिळण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यात इतर शाखांमध्ये प्रवेश कसे मिळणार, हा प्रश्न आहे. - निकिता मानोरकर, विद्यार्थिनी
कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका सर्वांनाच बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. बारावीची गुणदान पद्धती थोडी किचकट, क्लिष्ट असल्याचे दिसून येते. गुणदान कमी झाल्यास यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. याचा परिणाम बारावीनंतरच्या विविध विद्याशाखेत प्रवेश घेण्यावर होणार आहे.- समाधान देशमुख, विद्यार्थी
गुणदानाबाबत गोंधळाची अवस्था आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे दहावीत मेरिट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसानकारक ठरेल. अंदाजे गुणदान करणे चुकीचे ठरणारे राहील.- प्रा. वसंतराव देशमुख.
बारावीच्या गुणदान प्रक्रियेत दहावी आणि अकरावीचे गुण विचारात घेतले जाणार आहेत. दहावीचे ठीक राहील. परंतु गतवर्षी अकरावीची परीक्षा झाली नसल्याने गुणदान करताना थोडी अडचणही राहणार आहे.- प्राचार्य विनोद नरवाडे