माहुली : येथून जवळच असलेल्या भुली येथील शेत शिवारात नाल्याच्या काठावर १५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळून आले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली.
प्राप्त माहितीनुसार, भुली शेत शिवारात नाल्याच्या काठावर दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी भुलीच्या पोलीस पाटील छाया अरूण डहाके यांना दिली. त्यांनी मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्याशी संपर्क साधून याबाबत अवगत केले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत व्यक्ती १५ ते २० दिवसांत मरण पावले असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
...............
दोन्ही मृतकांची ओळख पटली
मानोरा पोलीस स्टेशनमध्ये वाईगौळ येथील काही व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झालेली होती. त्यानुषंगाने ठाणेदार सुनील जाधव यांनी तक्रारकर्त्या नागरिकांना भुली शेत शिवारात घटनास्थळी बोलाविले असता, मृतक व्यक्तींची नावे अशोक धनसिंग राठोड (५७) आणि काशीराम नरसिंग आडे (६०) असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांकडून मृतकांची ओळख पटविण्यात आली. संबंधितांना कुणी व का मारले, याचा तपास पोलीस करत आहे.
................
वैद्यकीय अधिकाऱ्यांची अशीही अनास्था
मृतक दोन्ही व्यक्तींचे शवविच्छेदन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यात आला ; मात्र वृत्त लिहिस्तोवर तीन तास आरोग्य विभागाकडून एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता.