लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून, आता १४ सप्टेंबर रोजी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदारसंघातून ही निवडणूक होत असून, एकंदरीत १0५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी २८ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होती. त्यानुसार, शेवटच्या दिवशी १0 उमेदवारी अर्ज दाखल झाले. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्याच दिवशी दहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ५ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. अनु. जाती स्त्री प्रवर्गाचा अपवाद वगळता उर्वरित दोन्ही प्रवर्गातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन उमेदवारांची अविरोध निवड झाली. अनु. जाती स्त्री प्रवर्गातून भाजपाच्या करुणा कल्ले (वाशिम) व रा.काँ.च्या संघमित्रा पाटील यांच्यात आता सरळ लढत होणार आहे. याच प्रवर्गातील वर्षा इंगोले (कारंजा) व प्रतिभा सोनोने (कारंजा) यांनी उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भाजपा व रा.काँ.मध्ये थेट लढत होणार असल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून सविता इंगोले (वाशिम) यांनी अर्ज मागे घेतल्याने हिना कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) यांची अविरोध निवड झाली, तर सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शे. अनिसाबी युनूस (कारंजा), रेखा शर्मा (वाशिम), सुमन परळीकर (मंगरूळपीर) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्योती लवटे (मंगरूळपीर) यांची अविरोध निवड झाली.
भाजपा व भारिप-बमसंचे उमेदवार अविरोधवाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषदेत भाजपा व भारिप-बमसंचे संख्याबळ बर्यापैकी होती. या संख्याबळावर दोन्ही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार अविरोध झाले आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून भाजपाच्या ज्योती विश्वास लवटे (मंगरूळपीर) तर नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून भारिप-बमसंच्या हिना कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) यांची अविरोध निवड झाल्याने राजकीय समीकरण बदल असल्याचे संकेत मिळत आहे. मंगरुळपीर व वाशिम नगर परिषदेत भारतीय जनता पार्टी व भारिप-बमसंची युती आहे. युतीचा धर्म पाळत जिल्हा नियोजन विकास समितीच्या निवडणुकीतदेखील भाजपा व भारिपने आपले उमेदवार अविरोध निवडून आणण्यात यश मिळविले आहे.-