हिंगोलीच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील दोन जणांची देपूळवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 4:26 PM
संबंधित रूग्णाच्या संपर्कातील दोन जण एका वाहनाने २४ एप्रिल रोजी देपूळ येथील एका माजी सरपंचाच्या घरी आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्कदेपुळ (वाशिम) : हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बेल येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील दोन जण वाशिम तालुक्यातील देपूळ येथे २४ एप्रिल रोजी येऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच २५ एप्रिल रोजी एकूण ९ जणांना होम क्वारेंटीनसंदर्भात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने नोटीस बजावली.काही दिवसापुर्वी हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बेल येथील एक जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्या गावातील संबंधित रूग्णाच्या संपर्कातील दोन जण एका वाहनाने २४ एप्रिल रोजी देपूळ येथील एका माजी सरपंचाच्या घरी आले होते. याची माहिती ग्रामपंचायत तथा आरोग्य विभागाला मिळाली. त्यावरुन खबरदारीचा उपाय म्हणुन ग्राम पंचायतने त्या दोन व्यक्तीच्या संपर्कातील दोन घरातील ६ नागरिकांना तसेच परजिल्ह्यातून आलेल्या त्या व्यक्तीच्या कुटुंबातील तीन जण अशा एकूण ९ जणांना १४ दिवस होम क्वारेंटीन राहण्याच्या नोटीस काढून त्यांच्या हातावर शिक्के मारल्याची माहिती कळंबा महाली आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. दिपाली देशमुख यांनी दिली. होम क्वारेंटीन केलेल्या नागरिकांच्या तब्येतीची तपासणी व चौकशी दररोज केली जात असून, जर काही लक्षणे आढळल्यास त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवू, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.