वाशिम : गंभीर आजारातील रुग्णांसाठी २४ तास वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यापूर्वी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला; मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे तो अद्याप कार्यान्वित होऊ शकला नाही. यामुळे शासनस्तरावरून बाळगलेला मूळ उद्देश असफल झाल्याचे दिसून येत आहे.जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून गंभीर व अतिगंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल होेतात. त्यांच्यावर उपचार सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यास उपचाराकरिता असलेले विविध यंत्रदेखिल बंद पडतात. परिणामी, रुग्णांच्या उपचारात अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन ३१ जुलै २०१९ रोजी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून जिल्हा सामान्य रुग्णालयात सौर ऊर्जा संयंत्र प्रकल्पाची उभारणी करण्यात आली; परंतु हे संयंत्र दीड वर्षे उलटूनही अद्याप हा प्रकल्प आणि संयंत्र कार्यान्वित करण्यात आले नाही. यामुळे मूळ उद्देशाला हरताळ फासल्या गेला असून गंभीर आजारातील रुग्णांचा जीव धोक्यात सापडत आहे.सदर प्रकल्प सुरु करण्यामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करुन हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. ‘मनसे’ करणार आंदोलनजिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरिब, गरजू रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यांच्यासाठी लावण्यात आलेले यंत्र सदोदित सुरू राहावेत, यासाठी अखंडित वीज पुरवठा आवश्यक आहे आणि त्याकरिता दीड वर्षांपूर्वी सौरऊर्जा संयंत्र प्रकल्प मंजूर झाला. असे असताना प्रशासकीय उदासीनतेमुळे सदर प्रकल्प अद्याप कार्यान्वित झालेला नाही. हा प्रश्न तात्काळ निकाली काढा; अन्यथा डफडे बजाओ आंदोलन करू, असा इशारा ‘मनसे’चे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, राजू किडसे, मो. नौरंगाबादी, बाळू विभुते, निखील बुरकुले यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेडेकर यांच्याकडे निवेदनाव्दारे दिला.
दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:27 PM