- नंदकिशोर नारे ।
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा पावणे दोन कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे.
वाशिम नगरपरिषद क्षेत्रांतर्गंत येत असलेल्या शासकीय- निमशासकीय कार्यालयाचा कर थकबाकीचा आकडा पावणे दोन कोटीच्या घरात असल्याने कर विभागाला ही करवसुली करण्याकरिता मोठी कसरत करावी लागणार आहे. वाशिम नगरपरिषदेची करवसुली जिल्हयातील तीनही नगरपालीकेपेक्षा सर्वाधिक आहे. गत तीन वर्षापासून करवसुलीत वाशिम नगरपरिषद आघाडीवर आहे. यावर्षी नगरपालीका कर विभागाने १०० टक्के करवसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षी शासकीय कार्यालयांकडे सव्वा तीन कोटीच्या घरात होती ती आज पावणे दोन कोटीवर आली आहे. मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या पुढाकाराने कर विभागातील करनिरिक्षक अब्दुल अजिज अब्दुल सत्तार व त्यांची टिम करवसुलीसाठी परिश्रम घेत आहेत. गतवर्षी नगर परिषदेच्यावतीने वर्षभरात ५ कोटी रुपयांची करवसुली केली होती ती चालुवर्षात जानेवारी महिन्यातच पूर्ण करुन एक उत्कृष्ट कार्य केले होते. याहीवर्षी मार्चपूवी शंभर टक्के करवसुली करण्याचा मानस कर विभागाने व्यक्त केला आहे.
काही शासकीय कार्यालयाची कर थकबाकी लाखोच्या घरात असल्याने त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पुन्हा सांगून आवाहन केल्या जाणार आहे त्यानंतरही कराचा भरणा न केल्यास नोटीसेस बजावण्यात येणार असल्याची माहिती कर विभागाच्यावतिने देण्यात आली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत धोरण आखून कार्यवाही केल्या जाणार आहे. तसे संबधित थकीत कर धारकांना वारंवार भेटून कर भरण्यासाठी सांगण्यात येत आहे. लाखो रुपयांचा कर थकीत असलेल्या काही प्रमुख शासकीय कार्यालयांकडे कर विभागा विशेष लक्ष देवून आहे.
थकीत वसुलीसाठी नगर परिषद कर विभागाच्यावतीने कसोशिने प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भात नगरपरिषद कर विभागातील करनिरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करसंग्राहक वसुलीसाठी प्रयत्न करताहेत. मात्र, त्यांना यश मिळत नाही.
शहर विकासाला हातभार लावण्यासाठी करवसुलीसाठी कर विभागातील करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी मोहीम राबविणे सुरु केली आहे. त्यांना सहकार्य करावे.
- गणेश शेटे, मुख्याधिकारी, वाशिम नगरपरिषद