मालेगाव(जि. वाशिम): धाब्यावर घरगुती गॅसचा वापर करीत असल्याच्या माहितीवरून मालेगाव पोलिसांनी छापा टाकला असता एका धाब्यावर दोन घरगुती गॅस सिलिंडर आढळून आले. याप्रकरणी धाबा चालकाविरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशनला १९ नोव्हेंबरच्या रात्री गुन्हा दाखल केला. घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर ग्रामीण भागातील हॉटेल्स, धाब्यावर येथे सर्रासपणे वापरले जात आहे. यापूर्वी मालेगाव पुरवठा विभागाने जऊळका रेल्वे परिसरातून हॉटेल्स व धाब्यावरून घरगुती सिलिंडर गॅस जप्त केले होते; मात्र कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा हॉटेल्स व धाब्यावर घरगुती गॅस खुलेआम वापर सुरू झाला. याबाबत मालेगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळता, मालेगाव-मेहकर महामार्गावर वडप फाट्याजवळच असलेल्या तृप्ती धाब्यावर १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान छापा टाकला. यावेळी दोन घरगुती गॅस सिलिंडर व इतर साहित्य ताब्यात घेऊन तृप्ती धाबा चालक सुरेश प्रल्हाद गायकवाड याच्याविरुद्ध ३,७ ई.सी अँक्टनुसार गुन्हा दाखल केला. सिलिंडर गॅसची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून हॉटेल, धाबा व इतर व्यावसायिक क्षेत्रात घरगुती सिलिंडरचा वापर करण्यावर शासनाने बंदी आणली आहे; मात्र मालेगाव तालुक्यात सर्रास या नियमाची पायमल्ली होत आहे. पोलिसांनी कारवाई करून एका हॉटेल चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत सातत्य असणे गरजेचे आहे.
धाब्यावरून दोन घरगुती सिलिंडर जप्त
By admin | Published: November 21, 2015 2:03 AM