लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : महू येथील कार्यक्रमादरम्यान भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविण्यासोबतच दगडफेकीचा प्रयत्न झाला. या भ्याड हल्ल्याचा भारिप-बमसंच्यावतीने भारिपचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनात सोमवार, १० जुलै रोजी तर भारिप पक्षाचे नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी काही समर्थक घेऊन ११ जुलै रोजी निषेध म्हणून रस्ता रोको केला. भारिप-बहुजन पक्षात कारंजा नगर परिषदमधील सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे दोन गट झाल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगत आहे. महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीला भेट देण्यासाठी गेलेले त्यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून दगडफेकीचा प्रयत्न झाला. हा प्रकार समाजाची अवहेलना करण्यासारखा आहे. भाजप काळात स्मारक होत असले, तरी ते काही विशिष्ट संघटनांनी काबीज केले आहे, त्यामुळे तेथे काहींची मक्तेदारी तयार होत आहे. त्या ठिकाणी भेट दिली असता, हा भ्याड हल्ला झाला आहे. असे प्रकार सुरू राहिल्यास भारिप-बमसंच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्यांना भाजप सत्तेकडून पाठबळ दिले जात आहे, त्यामुळे शासनाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.अॅड. आंबेडकर यांना स्वतंत्र सुरक्षा देण्यात यावी, दोषींवर त्वरित कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, न. प. उपाध्यक्ष एम.टी. खान, गटनेते फिरोज शेकुवाले, बांधकाम सभापती जुम्मा पप्पूवाले, सभापती जावेद शेख, जाकीर अली, जाकीर शेख, सलीम गारवे, सलीम प्यारेवाले, निसार खान, तालुकाध्यक्ष भारत भगत, शहर अध्यक्ष देवराव कटके,संघटक शेषराव चव्हाण, चंदन गणराज, सय्यद मुजाहिद, सचिन खांडेकर, राजू इंगोले, बापूराव सोनटक्के, वैभव रामटेके, युनूस पहिलवान, आरिफ, इर्शाद अली, युसूफ खान आदींसह भारिप कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते; मात्र योवळी भारिप पक्षाचे नगराध्यक्ष शेषराव ढोके यांची उपस्थिती नव्हती. शेषराव ढोके यांचे वर्चस्व कायम रहावे, याकरिता त्यांनीसुद्धा काही समर्थक घेऊन ११ जुलै रोजी सावरकर चौकात १२ वाजताच्या दरम्यान रास्ता रोको केला. यावेळी भारिप-बहुजन पक्षाचे कोणतेही पदाधिकारी तथा भारिपचे नगरसवेक उपस्थित नव्हते; मात्र भारिपचे सर्कलनिहाय पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे भारिप पक्षात राजकीय वादामुळे दोन गट निर्माण झाल्याची चर्चा जोरात रंगत आहे. ११ जुलै रोजी झालेला रास्ता रोको हा भारिप-बहुजन महासंघाकडून आयोजित नव्हता. त्यामुळे भारिप- बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. तसेच १० जुलै रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावेळी नगराध्यक्ष उपस्थित नव्हते, याबाबत ते कुठे तरी गेले असावेत.- युसूफ पुंजानी, भारिप-बहुजन महासंघ जिल्हाध्यक्ष१० जुलै रोजी अकोला येथे भारिप बहुजन पक्षाच्या नियोजनाची बैठक होती. तसेच ११ जुलै रोजी रास्ता रोको संदर्भात युसूफ पुंजानी यांना फोन केला होता. ते बाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रस्ता रोकोसाठी भारिप पक्षाचे सर्कलनिहाय कार्यकर्ते उपस्थित होते. मी आंदोलनकर्ता असल्यामुळे निवेदन देणे समाधानकारक नाही. अंतर्गत राजकीय वाद नाहीत; मात्र मी अध्यक्ष अध्यक्षासारखा राहीलच. - शेषराव ढोके, नगराध्यक्ष कारंजा
कारंजात भारिप-बमसंमध्ये दोन गट!
By admin | Published: July 12, 2017 1:35 AM