कोलार (वाशिम) : मानोरा तालुक्यातील कोलार येथे रानडुकराच्या हल्ल्यात एका शेतकºयासह शेतमजुर गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार २५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
कोलार परिसरात जंगलाचे प्रमाण मोठे असून, या जंगलात रानडुक्कर, हरीण, चितळ, निलगायीसह इतर वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने हे वन्यप्राणी सायंकाळच्या सुमारास गावालगतचे, तलाव, धरणांवर पाण्यासाठी झुंडीने येत आहेत. अशात मानवाचा हस्तक्षेप होत असल्याने हे प्राणी बिथरत असून, याच प्रकारातून गुरुवारी कोलार शिवारातील एका शेतात काम करणाऱ्या शेतकऱयासह शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाल्याचे चित्र मानोरा तालुक्यात पाहायला मिळत असून, मागील काही दिवसांपूवी रानडुकराच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली. या पृष्ठभूमीवर वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी तातडीने जंगलात पाणीसाठे तयार करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकरी व शेतमजुरांकडून करण्यात येत आहे.