वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातही कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेने सुरू केल्या असून, त्या अनुषंगाने २६ एप्रिल रोजी आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात ब़ैठक घेण्यात आली. यावेळी दोन एमडी डॉक्टरांची सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्यावर एकमत झाले.
जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. जिल्हा कोविड हॉस्पिटल व कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचा अपवाद वगळता एकाही सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार किंवा ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे गोरगरीब व ग्रामीण भागातील रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’नेदेखील वृत्त प्रकाशित करून संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरावर कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या असून, २६ एप्रिल रोजी बैठकही पार पडली. यावेळी आमदार अमित झनक, जि. प.चे अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कोविड हॉस्पिटलसाठी एम.डी. डॉक्टरांची आवश्यकता असून, कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची सेवा घेण्यावर एकमत झाले. ऑक्सिजनबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली असून, ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याबाबतही जिल्हा परिषद सकारात्मक पाऊल उचलेल, असेही बैठकीत ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मालकिच्या एका गोडाऊनची पाहणीदेखील करण्यात आली.
०००००
कोविड हॉस्पिटल उभारणीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. दोन एमडी डॉक्टरांची सेवा घेणे, आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा, याशिवाय ऑक्सिजन उपलब्धता या दृष्टीने आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा झाली. या कामी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांचेदेखील सहकार्य लाभले आहे. कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सकारात्मक असून, यादृष्टीने नियोजन केले जात आहे.
- चक्रधर गोटे
सभापती शिक्षण व आरोग्य
जिल्हा परिषद वाशिम