-------------
धनज बु. कोरोनामुक्त
धनज बु.: येथे गेल्या १३ दिवसांपूर्वी एका व्यक्तीस कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळले होते. आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने त्या व्यक्तीस कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी केली. त्यापैकी एकाही व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचे आढळले नाही. बाधितानेही कोरोनावर मात केल्याने त्याला रविवारी सुटी देण्यात आली.
--------
हळदीच्या काढणीची तयारी
कामरगाव : परिसरात हळदीचे पीक परिपक्व अवस्थेत आले आहे. त्यामुळे या पिकाच्या काढणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून, येत्या १५ दिवसांत परिसरात हळदीच्या काढणीला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव सुरू केली आहे. यासाठी हळद उत्पादक शेतकरी विविध गावांत मजुरांचा शोध घेत आहेत.
-------------
ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन
येवता : कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनात मनभा येथे शेतकऱ्यांना सोमवारी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक, मंडल अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना आत्मा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
---------
वर्षभरापासून रस्त्याचे काम अर्धवट
बांबर्डा कानकिरड : येवता ते मनभा या चार किलोमीटर अंतराच्या आणि १ लाख १७ हजार रुपये खर्चाच्या रस्ता कामाला २४ जानेवारी २०१९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली; परंतु ४ जानेवारीपर्यंतही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
----------
कोरोना जनजागृतीसाठी कार्यशाळा
शेंदुरजना आढाव : येथून जवळच असलेल्या हिवरा खु. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने प्रशासनाच्या मार्गदर्शनात कोरोनाविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे. यात सरपंच अनिल चव्हाण, उपसरपंच बाळू झामरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसचिवांच्या उपस्थितीत आरोग्य पथकाकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे.