जिल्ह्यात कडक निर्बंधाच्या कालावधीतही कोरोनाचा आलेख चढताच असल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे वाशिम तालुक्यात आढळून आले आहेत. गत तीन दिवसांत इतर तालुक्याच्या तुलनेत वाशिम तालुक्यात कमी रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी वाशिम तालुक्यात १७३ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये शहरी भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. वाशिम शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने, शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे मृत्युसत्रही कायम असल्याने, यामध्ये आणखी भर पडत आहे. जिल्ह्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी घेण्यात आली. एकूण ६५६ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १७३, मालेगाव तालुक्यातील १२७, रिसोड तालुक्यातील १०२, मंगरूळपीर तालुक्यातील ५१, कारंजा तालुक्यातील ६६ आणि मानोरा तालुक्यात ९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ४३ बाधिताची नोंद झाली असून, ४४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
०००००००००००
ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण
शुक्रवारच्या अहवालानुसार, ग्रामीण भागातही अधिक संख्येने रुग्ण आढळून आल्याचे दिसून येते. शिरपूर येथील ३९, अनसिंग येथील १०, उकळीपेन येथील ८ यासह अन्य ठिकाणी अधिक संख्येने रुग्ण आढळून आले. शिरपूर येथे तब्बल ३९ रुग्ण आढळून आल्याने, आरोग्य चमूने गावात तळ ठोकला असून, संदिग्ध रुग्णांची तपासणी सुरू केली. ग्रामीण भागात गृहविलगीकरणाची फारशी सुविधा नसतानाही अनेक रुग्ण हे गृहविलगीकरणात राहत आहेत. घरात स्वतंत्र व्यवस्था नसतानाही या रुग्णांना संबंधित प्रशासनाकडून गृहविलगीकरणाची परवानगी कशी मिळते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतंत्र व्यवस्था असेल, तरच गृहविलगीकरणास परवानगी मिळावी, अन्यथा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करावे, असा सूर सूज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.
०००००००००००
४४२ जणांची कोरोनावर मात
शुक्रवारच्या अहवालानुसार, नव्याने ६५६ रुग्ण आढळून आले, तर ४४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४,५२९ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
एकूण पॉझिटिव्ह ३४,६८५
ॲक्टिव्ह ४,५२९
डिस्चार्ज २९,७९९
मृत्यू ३५६