...............
पावसाची उघडीप, पेरणीला गती
वाशिम : जिल्ह्यात सर्वदूर मंगळवारी धुवाधार पाऊस कोसळला. बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पेरणीच्या कामास गती मिळाल्याचे पाहावयास मिळाले.
............
खेड्यांमध्ये पेट्रोलची अवैध विक्री
वाशिम : तालुक्यातील खेड्यांमध्ये वाहन पंक्चर काढणारी दुकाने, हाॅटेल्स आदी ठिकाणी पेट्रोल, डिझेलची अवैधरित्या विक्री केली जात आहे. हा प्रकार तत्काळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.
...............
एकबुर्जी प्रकल्पाच्या पातळीत वाढ
वाशिम : गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाच्या पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावणार नसल्याचे दिसत आहे.
............
महसूल विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
वाशिम : शहरातील महसूल विभागाच्या जमिनींवर काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. काही लोकांनी पक्की घरेदेखील बांधली असून याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
.............
कोरोना नियमांचे पालन करा
वाशिम : निर्बंध पूर्णत: शिथिल झाले असले तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णत: संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर न राहता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
...............
मुख्य चाैकातील रहदारी विस्कळीत
वाशिम : शहरातील पाटणी चाैक, शिवाजी चाैक, पुसद नाका आदी ठिकाणच्या मुख्य चाैकांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा रहदारी विस्कळीत होत आहे. शहर वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी बबन देशमुख यांनी केली.
...............
मंदिरांचीही कुलूपे खोलण्याची मागणी
वाशिम : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद ठेवण्यासोबतच सर्वधर्मियांची मंदिरेही बंद करण्यात आली होती. ती आता दर्शनासाठी सुरू करावी. मंदिरांचीही कुलूपे खोलावी, अशी मागणी मनिष बत्तुलवार यांनी केली.
...............
आययूडीपी काॅलनीत मैदानाची उभारणी
वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी काॅलनीमध्ये नगरपरिषदेकडून मैदानाची उभारणी करण्यात आली. सर्वसुविधांयुक्त या मैदानामुळे परिसरातील नागरिकांची सोय झाल्याचे दिसून येत आहे.
...............
मेडशी येथे तीन कोरोनाबाधित
मेडशी : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित पहिला रुग्ण मेडशी येथे आढळला होता. आता गावात परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे; मात्र बुधवारी पुन्हा तीन नवे कोरोनाबाधित आढळले. गावकऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
....................
भुईमूग उत्पादकांचे प्रचंड नुकसान
वाशिम : जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी भुईमुगाचे उत्पादन घेण्यात येते. शेतकऱ्यांना या माध्यमातून विक्रमी उत्पन्नदेखील मिळते; मात्र यंदा उत्पादनात विक्रमी घट झाल्याने प्रचंड नुकसान झाले, अशी माहिती शेतकरी प्रदीप इढोळे यांनी दिली.
................
जिल्ह्यात खासगी वाहतूक पूर्वपदावर
वाशिम : मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात खासगी वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. आता मात्र ही वाहतूकही पूर्वपदावर आली असून कोरोनाविषयक नियम पाळून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे.