वाशिम : वीज प्रवाहित तार बांबूला गुंडाळून मासे पकडत असताना जबर शाॅक लागून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, ४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील आमगव्हाण (ता.मानोरा) शेतशिवारातील गोखी नाल्यावर घडली.प्राप्त माहितीनुसार, मृतक धनंजय महादेव कटारे (४८) आणि गणपत चरमू कटारे (६५) हे दोघे रविवारी सकाळी आमगव्हाण शेतशिवारातील गोखी नाल्यावर मासे पकडायला गेले होते. वीज प्रवाहित तार बांबुला गुंडाळून आणि तो बांबू पाण्यात खोलवर टाकून अत्यंत धोकादायक प्रकारे मासे पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, त्याचाच शाॅक लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला.उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटूंबियांनी गोखी नाल्याजवळ जाऊन पाहिले असता, दोघांचेही मृतदेह नाल्याच्या पाण्यात आढळून आले. घटनेची वार्ता गावात पसरताच लोकही धाऊन गेले. मानोरा येथील शासकीय रुग्णालयात दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी गजानन मोहनसिंग कटारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मासे पकडायला गेलेल्या दोघांचा शाॅक लागून मृत्यू; आमगव्हाण येथील घटना : आकस्मिक मृत्यूची नोंद
By सुनील काकडे | Published: February 04, 2024 7:33 PM