कारंजालाड : अपुर्या फलाटामुळे प्रवाशी, चालक आणि वाहक यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून स्थानिक एस.टी. बसस्थानकावर नव्याने दोन फलाटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची दीर्घकालीन मागणी फळाला आली आहे. येथील बसस्थानकावर सध्या सहा फलाट आहेत. परंतु प्रवाशी संख्या लक्षात घेता हे फलाट अपुरे पडतात. त्यामुळे फलाटांची संख्या वाढविण्यात यावी अशी प्रवाशांची दीर्घकालीन मागणी होती. याशिवाय येथून मानोराकडे दिवसभर्यात २0 ते २५ पेक्षा अधिक बसेसच्या फेर्या होतात. यावरून या रस्त्यावरील एस.टी.बसेसच्या प्रवाशांची संख्या ध्यानात येते. दरम्यान, या मार्गावर प्रवास करणार्यांची बसस्थानकावर फलाटाअभावी प्रचंड गैरसोय होते. जागेअभावी प्रवाशांना फलाटाबाहेर उघड्यावर उभे राहावे लागते. परिणामी प्रवाशांना धूळ आणि गर्दीमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. मानोरा मार्गासाठी विशेष फलाट द्यावे, अशी प्रवाशांची मागणी होती. आता नव्याने फलाट होणार असल्याने ही समस्याही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारंजा शहर हे वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती या चार जिल्ह्याच्या मधोमध वसले आहे. या चारही ठिकाणी प्रवाशांना येथून जाणे अतिशय सूकर ठरते. त्यामुळे येथील बसस्थानकावरून या गावांसाठी १५ ते २0 मिनीटाला बसेसची रेलचेल असते. पण अपुर्या फलाटामुळे अगोदर आलेल्या बसला बाजू देण्याच्या उद्देशाने मागील बसला ताटकळत राहावे लागते. तसेच सहा फलाट अपुरे पडत असल्याने प्रवाशी मोठय़ा संख्येने बाहेरच उभे राहतात. या परिस्थितीपासून प्रवाशी, चालक आणि वाहकाची सुटका व्हावी याकरिता दोन नवीन फलाट निर्माण करण्यात येणार आहेत. बसस्थानकात अगोदर सहा फलाट असल्याने आता फलाटांची संख्या आठ होणार असल्याने बरेचसे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी फलाट निर्मितीच्या कामाचे भूमिपूजन झाले असून, लवकरच या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
कारंजालाड बसस्थानकावर वाढणार दोन फलाट
By admin | Published: June 12, 2014 9:31 PM