वाशिम: तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे. उकळपेन येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांत गैरप्रकार झाल्याची, तर गोंडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमण हटविण्यात अपयशी ठरल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. या बाबत आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत. ही माहिती गुरुवारी प्राप्त झाली उकळीपेन येथे १३ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता कामात सरपंच, उपसरपंचआणि ग्रामसचिवांंनी अनियमितता व गैरप्रकार करून या कामात २८ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च केल्याची तक्रार कैलास भोयनवाड, मोतीराम कुटे, माधव लांडे, जीवन महाले, मोहनराव गांजरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली होती. त्याशिवाय सरपंच आणि ग्रामसचिवांनी इंदिरा आवास योजनेतही गैरप्रकार केल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणी वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलेल्या चौकशी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसचिवांनी सदर रस्ता कामात अतिरिक्त खर्च करताना कोणतीही तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता न घेतल्यामुळे सरपंच आणि उपसरपंच महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८ मधील कलम ३९(१) नुसार दोषी असल्याचा अहवाल दिला होता, तसेच सदर ग्रामपंचायतीला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये, असा सवाल पत्राद्वारे गटविकास अधिका-यांना केला होता; परंतु ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला काळ्या यादीत टाकण्याऐवजी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी करून अमरावती आयुक्तांनी उकळी पेनचे सरपंच आणि उपसरपंचांना पदासाठी अपात्र ठरविले. तसेच मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या निर्देशानुसार ग्रामसचिवांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिले. दरम्यान, गोंडेगाव येथील भाऊराव कोल्हे आणि गिरीराज चौधरी यांनी गावातील रस्ते, खुली जागा आणि नाल्यांवर केलेल अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली होती; परंतु सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांनी या कामास टाळाटाळ केल्यामुळे त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार करून सदर प्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह चार सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी ती मागणी फे टाळत आयुक्तांकडे प्रकरण वर्ग केले होते. आयुक्तांनी या प्रकरणी सर्व पुराव्यांची तपासणी करून निर्णय देताना सरपंच, उपसरपंच आणि दोन सदस्यांनाही पदासाठी अपात्र ठरविण्याचे आदेश दिले.
वाशिम तालुक्यातील दोन सरपंच, उपसरपंच अपात्र! उकळीपेन, गोेंडेगाव ग्रामपंचायतीमधील प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 4:11 PM