लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी दोन हजार ते २२०० च्या आसपास सीटी स्कॅन केले जात आहेत. मात्र, शासकीय दरापेक्षा अधिक दर आकारले जात असल्याने रुग्णांना भुर्दंड बसत आहे.
सिटी स्कॅन करताना रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रामध्ये सीटी स्कॅनचा दर निश्चित केला आहे. स्लाईसनुसार किमती निश्चित केल्या आहेत. २००० ते ३००० या दरम्यान या किमती असून यापेक्षा जास्त दर आकारू नये, असे निर्देशही दिले आहेत. असे असताना काही खासगी केंद्र ३५०० ते ४००० रुपये शुल्क वसूल करीत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.
खासगी केंद्रातील कोरोना रुग्णांना सीटी स्कॅन आणि इतर तपासण्यांसाठी जादा दर मोजावे लागत आहेत. खासगी कोविड हाॅस्पिटलमधील देयकांची जशी जिल्हास्तरीय समितीने पडताळणी केली, त्याचप्रमाणे सिटी स्कॅन केंद्रावरही पडताळणी करावी, असा सूर रुग्णांच्या नातेवाइकांमधून उमटत आहे. २००० रुपये शासकीय दर असताना २५०० ते २८०० रुपये आणि २५०० रुपये शासकीय दर असलेल्या सिटी स्कॅनसाठी तीन हजार ते ३२०० रुपयादरम्यान पैसे वसूल केले जातात, याबाबत पावतीही दिली जात नाही, असे नातेवाइकांनी सांगितले.
000
पावतीही दिली नसल्याने आर्थिक लूट
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक वाढत असतानाच कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना विविध तपासण्यांसाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागत आहे. सीटी स्कॅन तसेच विविध तपासण्यांसाठी जादा शुल्क आकारले जात आहे. पावतीही दिली जात नसल्याने आर्थिक लूट होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गत काही दिवसांपासून मेटाकुटीस आले आहेत.
000
कोरोना कालावधीत सेवा देण्यासाठी डाॅक्टर प्रयत्नरत आहेत. रुग्णांना सुविधा देण्यासाठी सरकारी यंत्रणेची धडपड सुरू आहे. दरम्यान, शासकीय दरानुसारच सर्व शुल्क आकारले जावे, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. कुणी अतिरिक्त शुल्क आकारत असेल आणि पावती देत नसेल तर संबंधितांनी प्रशासनाकडे तक्रार करावी. या तक्रारीनुसार पडताळणी केली जाईल. यामध्ये दोषी आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
-डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
0000
कोरोना संसर्गाचा दुर्दैवी सामना परिवारातील एका सदस्याला करावा लागला. खबरदारीचा उपाय म्हणून सिटी स्कॅन व अन्य तपासण्या करण्यात आल्या. सिटी स्कॅनसाठी ३५०० रुपये आकारण्यात आले. पावतीची मागणी केली नाही. नाइलाजाने रुग्ण वाचविण्यासाठी धडपड करावी लागते.
- वामनराव अवचार, नातेवाईक,
00
कोरोना संसर्ग काळात खबरदारीचा उपाय म्हणून सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यानंतर सिटी स्कॅन करण्यात आले. सिटी स्कॅनचे शासकीय दर किती आहेत, याची माहिती सर्वसामान्य जनतेला नाही तसेच सीटी स्कॅन केंद्रातही शासकीय दराचा फलक लावण्यात आला नाही. त्यामुळे सिटी स्कॅनसाठी अतिरिक्त पैसे घेतले जातात. शासकीय दरपत्रक दर्शनी भागात लावले, तर या प्रकारात आळा बसू शकेल.
- प्रमोद लाड, नातेवाईक,
00