वाशिम : आगामी सणासुदीनिमित प्रवाशांच्या सोयीकरिता दक्षिण मध्य रेल्वेतर्फे अकोला ते पूर्णा या मार्गावरुन वाशिममार्गे दोन विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महेन्द्रसिंग गुलाटी यांनी रविवारी दिली.येणाऱ्या सणासुदीचा विचार करून प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वेने दोन फेस्टिवल विशेष गाड्या चालविन्याचा निर्णय घेतला असून या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित असणार आहेत. त्यामुळे या रेल्वे गाड्यामध्ये अनारक्षित प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही. सुरु होत असलेल्या विशेष गाड्यामध्ये गाडी संख्या १२७६५ तिरुपती-अमरावती ही द्वी साप्ताहिक रेल्वे २० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यन्त दर मंगळवार व शनिवारी तर १२७६६ या क्रमांकाची अमरावती ते तिरुपती ही गाड़ी दर गुरुवार व सोमवारी २२ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेबरपर्यन्त धावणार आहे. ०२७२० ही द्वी-साप्ताहीक हैदराबाद ते जयपूर रेल्वे दर सोमवार आणि बुधवारला २१ ऑक्टोंबर ते २५ नोव्हेबरपर्यन्त तर ०२७१९ जयपूर ते हैदराबाद ही बुधवार आणि शुक्रवार रोजी २३ ऑक्टोंबर ते २७ नोव्हेबरपर्यंत धावनार आहे, अशी माहिती गुलाटी यांनी दिली. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड-१९ संसर्गासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
वाशिममार्गे दोन रेल्वे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:50 PM