वाशिम : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा कारंजा येथे दुपारी १२:०० वाजता पार पडला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १३ मार्चला कारंजा दौऱ्यावर होते. कारंजा येथील मंगरूळपीर मार्गावरील शेतकरी निवासमध्ये जनसंवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी देशातील सरकारने नागरिकांची घोर फसवणूक केल्याचा घणाघात केला. याशिवाय कर्जमुक्ती, हमीभाव, पीकविमा, अतिवृष्टी मदत, यावर भाष्य करीत विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले. या निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीने कंबर कसल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री संजय देशमुख, डॉ. श्याम जाधव, सुरेश मापारी, प्रशांत सुर्वे, डॉ. सुधीर कव्हर, डॉ. सुधीर विल्हेकर, गणेश ठाकरे, सुनील महाराज, अनिल राठोड व महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती. मेळाव्याला शिवसैनिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.