उमेद अभियानांतर्गत घरगुती खाद्यपदार्थनिर्मिती, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, पीठगिरणी, झेरॉक्स मशीन, शिवणकाम, शिवणकाम क्लासेस, विणकाम क्लास हे उपक्रम हाती घेऊन महिलांनी रोजगारनिर्मितीचा एक चांगला पर्याय निवडला आहे. पार्डी ताड या गावामध्ये एकूण ३० महिला समूह कार्यरत आहेत, त्यापैकी २५ समूहांना फिरता निधी व १४ समूहांना बँक कर्ज उमेद अभियानामार्फत मिळाले आहे. प्रत्येक समूहातील महिलांनी आपले छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या संकटाच्या काळात प्रत्येक संकट हे संधी घेऊन येते हे लक्षात घेऊन गावात पशुसखी म्हणून काम करीत असलेल्या मंदा पानभरे यांनी स्वतः पीठगिरणी मसाले व हळद काढणी यंत्र घेऊन स्वतःचा एक उत्तम व्यवसाय सुरू केला. समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून काम करणाऱ्या सविता गणेश पार्डीकर यांनी शिवणकाम व विणकाम क्लासेस घेऊन स्वतःचा चांगला व्यवसाय सुरू केला आहे. या दोघींनीही गावातील इतर महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले. आज रोजी गावातील ३० ही समूहांच्या नियमित बैठका व नियमित बचत करून अभियानाच्या दशसूत्रीचे पालन होत आहे. समूहामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांना अभियानामुळे एक नवी ओळख निर्माण झाली आहे. गावातील समुदाय संसाधन व्यक्ती सविता पार्डीकर यांनी अनेक खासगी संस्थांमार्फत गावात घेण्यात येत असलेल्या शिवण क्लास प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे. आज यांचा स्वतःचा शिवणकाम व विणकाम क्लास सुरू असून प्रत्येक बॅचला गावातीलच दहा ते पंधरा मुली व महिला प्रशिक्षणार्थी असतात. समन्वयक ओमप्रकाश खोबरे यांच्या मार्गदर्शनात कार्य पार पडत आहेत.
उमेदच्या अभियानाने महिला झाल्या आत्मनिर्भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:40 AM