लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उच्च माध्यमिक शाळांचा ‘कायम’ हा शब्द वगळून त्यांना प्रचलित नियमानुसार आर्थिक अनुदान देण्यात यावे, या मुख्य मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांनी १८ जुलै रोजी एकदिवसीय बंद पुकारला, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणे आंदोलनही केले.उच्च माध्यमिक शाळांचा ‘कायम’ हा शब्द वगळून त्यांना प्रचलित नियमानुसार आर्थिक अनुदान देण्यात येईल, अशा स्वरूपातील शासन निर्णय २६ फेब्रुवारी २०१४ ला झाला. त्यानुसार, आॅगस्ट २०१४ मध्ये आॅनलाइन मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर २०१४-१५ मध्ये २० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, असे जाहीर झाले; मात्र त्यास तीन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत पात्र उच्च माध्यमिक शाळा अनुदानापासून वंचित आहेत. या धोरणाविरोधात शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उगारले असून, १८ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांनी एकदिवसीय बंद पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास यापुढेही तीव्र स्वरूपातील आंदोलने केले जातील, असा निर्धार आंदोलकांनी बोलून दाखविला.
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी दिले धरणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:06 AM