वाशिम : वाशिम शहराला अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी देताच, नगरपरिषद प्रशासन कामाला लागले आहे. गत काही काळातील अनुभव पाहता, अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा होऊ न देण्याची कसरत नगर परिषदेला करावी लागणार आहे.शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा गाजावाजा करीत वाशिम, रिसोड व कारंजा शहरात संबंधित नगरपरिषदेने यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली; मात्र १५ दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच 'जैसे थे' परिस्थिती झाली. आता आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी लाभले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे वाशिम शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविण्याचे आदेश नगरपरिषदेला दिले आहेत. शहरात अनधिकृत बांधकामे किती आहेत, याचा आढावा घेतल्यानंतर नगरपरिषदेने पोलीस विभागाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान, यापूर्वी जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा नगरपरिषदेने व्यापक प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली; मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याचे नियोजन केले नव्हते. परिणामी, अल्पावधीतच त्याच त्या रस्त्यालगत पुन्हा अतिक्रमण झाले. व्यापार्यांनी दुकानासमोर पुन्हा अतिक्रमण केले. दोन वर्षांपूर्वी मालेगाव ग्रामपंचायतनेदेखील व्यापक प्रमाणात अतिक्रमण हटविले. वाशिम, रिसोड, कारंजा नगरपरिषद व मालेगाव ग्रामपंचायत असा एकंदर लाखो रुपयांचा खर्च अतिक्रमण हटाव मोहिमेवर झाला आहे; मात्र भविष्यकालीन ठोस नियोजन नसल्याने अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा अल्पावधीतच सपशेल अपयशी ठरल्या. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याचे नियोजन नसणे, लघुव्यावसायिकांना पर्यायी जागा देणे आदी बाबी स्पष्ट नसल्याने रस्त्यालगत पुन्हा 'दुकानदारी' सुरू झाली आहे. वाशिम शहरात पाटणी चौक, शिवाजी चौक परिसरात अनेक व्यावसायिकांनी दुकानापुढील जागेवर ताबा केला आहे. परिणामी, वाहतूककोंडीत भर पडत आहे. आता दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्यांनीच अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाचा मुद्दा गांभीर्याने घेतल्याने नगरपरिषदांना हे आव्हान पेलावे लागणार आहे. सदर आव्हान नगरपरिषद कशी यशस्वी करते, यावर या मोहिमेचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
‘अनधिकृत बांधकाम हटाव’ची कसरत!
By admin | Published: June 29, 2015 1:40 AM