वाशिम : दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. वाशिम शहरचं नव्हे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोना बाधितांवर अनधिकृतपणे उपचार सुरू आहेत. यानुषंगाने वाशिम शहरातील नवजीवन या हॉस्पिटलला आरोग्य पथकाने भेट दिली असता त्याठिकाणी अनधिकृतरित्या कोविडबाधित २० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नवजीवन हॉस्पिटलच्या संचालकांना कायदेशीर नोटीस बजावून आपल्या हॉस्पिटलचा परवाना का रद्द करू नये? अशी विचारणा केली आहे.
कोणत्याही हॉस्पिटलमधील डॉक्टरांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड-१९ या आजाराच्या मार्गदर्शक सूचनांचे अधिन राहून जिल्हाधिकारी यांच्याकडून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा परवाना घेणे बंधनकारक आहे. हा परवाना देताना त्या हॉस्पिटलला काही अटी व शर्ती लागू करण्यात येत असतात. या अटीमध्ये आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. अशा रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी व हॉस्पिटलचे अधिकृत डॉक्टर, नर्सेस व इतर कामगार यांनाच प्रवेश देता येतो. रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश मिळत नाही. या सर्व नियमावलींचे सामान्य खासगी रुग्णालयांमध्ये पालन होत नाही.
शहर व जिल्ह्यातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये सर्रास कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे सर्वश्रूत आहे. असे असतानाही आरोग्य प्रशासनाने डोळे मिटून आंधळ्याचे सोंग घेतलेले दिसत आहे. हे आज उघडकीस आलेल्या नवजीवन हॉस्पिटलच्या भेटीमधून अधोरेखित झाले आहे.
बॉक्स घेणे
शहरात व जिल्ह्यात अनधिकृत कोविड सेंटरचा सुळसुळाट
वाशिम शहर व जिल्ह्यात अनेक हॉस्पिटलमध्ये अनधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांचा तपास घ्यावयाचा असल्यास शहरातील सिटी स्कॅन सेंटरहून एचआरसीटीच्या रुग्णांची माहिती गोळा केल्यास अनधिकृत कोविड सेंटरचा पर्दाफाश निश्चितच होऊ शकतो. अशाप्रकारची कार्यवाही झाली तर कोरोनाच्या वाढत्या प्रभावावर नक्कीच अंकुश लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
बॉक्स घेणे
एचआरसीटीमधील स्कोअरचा अर्थ आहे तरी काय ?
सिटी स्कॅन केल्यानंतर एचआरसीटीचा स्कोअर २५ पैकी ५ जर आला तर अशावेळी को रॅड्स ५ म्हणजेच कोविड १९ चे विषाणू उच्चस्तरावर असल्याचे संबोधले जाते. असे त्या रिपोर्टवर स्पष्टपणे नमूद असतानाही अनेक डॉक्टर आपल्या खासगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. हे उघड आहे.
कोट घेणे
आमच्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये न्यूमोनियाचे रुग्ण आहेत. आज जिल्हा शल्यचिकित्सक यांनी भेट दिली. आम्ही कोविड सेंटरची परवानगी घेतली नाही हे खरे आहे.
- डॉ. अस्लम शेख
संचालक, नवजीवन हॉस्पिटल