जऊळका रेल्वे (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ग्राम बोर्डी येथे पुतण्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने स्वत:च्या काकाचा खून करून त्याच्या शरीराला ४० ते ५० किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकून दिले. ही घटना २१ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर अकोला येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या सहकार्याने २६ सप्टेंबरच्या रात्री अडीच वाजताच्या सुमारास मृतक इसम रामदास पिराजी चव्हाण (रा.बोर्डी)याचे प्रेत विहिरीबाहेर काढण्यात जऊळका पोलिसांना यश आले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सरकार पक्षातर्फे पो.हे.काँ. विलास ताजणे यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की २२ सप्टेंबर रोजी घडलेल्या एका हत्येच्या प्रकरणात संशयीत आरोपी म्हणून सुरेश बळीराम चव्हाण, नारायण बळीराम चव्हाण (दोघेही रा. बोर्डी), वैभव पांडूरंग नवघरे (पांगरी नवघरे) आणि दिलीप सुभाष नखाते (मुंगळा) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी सुरेश चव्हाण आणि वैभव नवघरे यांनी चौकशीदरम्यान मृतक रामदास पिराजी चव्हाण यास आधी काठीने मारहाण करून आणि नंतर दोरीने गळा आवळला. रामदास चव्हाण मृत पावल्याची खात्री पटल्यानंतर शरीराला ४० ते ५० किलोचा भारी दगड बांधून आणि मृतदेहाला पोत्यात टाकून विहिरीत लोटून देण्यात आले.
आरोपींच्या अशा कबुली जबाबानंतर जऊळका पोलिसांनी २६ सप्टेंबरच्या रात्री सव्वा वाजताच्या सुमारास घटनास्थळ गाठले. यावेळी अकोला जिल्ह्यातील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे हे आपल्या चमूसह हजर होते. तब्बल सव्वा ते दीड तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर मृतदेह बाहेर काढण्यात पथकास यश आले. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून जऊळका पोलिसांनी नमूद चारही आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले.
दरम्यान सुरेश चव्हाण, वैभव नवघरे या दोघांना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत. घटनेचा पुढील तपास जऊळका पोलिस स्टेशनचे ठाणेदार बाळू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.