लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: प्रशासकीय कार्यालयात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पाचपेक्षा अधिक लोकांना प्रवेशावर बंधने आहेत; परंतु जिल्हाभराचे कामकाज पाहिल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासह जवळपास सर्वच प्रशासकीय कार्यालयात नागरिक मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. त्यात विविध प्रश्न, मागण्या, समस्यांच्या निराकरणासाठी निवेदन देण्याकरीता अनेक जण समुहानेच कार्यालयात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या दृष्टीने ही बाब निश्चितच घातक आहे.देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव होताच शासन, प्रशासन सर्तक झाले. नियंत्रणासाठी २३ मार्चपासून कठोर लॉकडाऊन करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. प्रशासकीय कार्यालयातही नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच यावे, तसेच ई-मेल किंवा स्मार्ट फोनचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. एवढेच काय, तर प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही ५० टक्क्यांवरच आणल्या गेली. अद्यापही यातील बहुतांश नियम कायम आहेत; परंतु त्याची दखल मात्र घेतली जात नाही. प्रशासकीय कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत आहे. कार्यालयाच्या कोणत्याही कक्षात पाचपेक्षा अधिक लोकांवर प्रवेश मनाई आहे; परंतु विविध कामांसह मागण्या, समस्या, तक्रारींचे निवेदन देण्यासाठी लोक समुहानेच प्रवेश करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणाचे प्रयत्नही प्रशासकीय अधिकाºयांकडून केले जात नाहीत.
शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी कायमच; कोरोना संसर्ग वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 5:35 PM