मालेगाव: उघड्यावर शौचवारी करणाऱ्या बेरोजगार युवक, युवतींना नोकरभरतीसाठी अपात्र ठरविण्याचा इशारा मालेगाव नगर पंचायतकडून देण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाची (नागरी) क ठोर अंमलबजावणी करण्याचा विडाच मालेगाव नगर पचांयतीने घेतल्याचे दिसत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३१ मे पर्यंत संपूर्ण मालेगाव शहर हागणदारीमुक्त करण्याचे ठरविण्यात आले असून, या मुदतीनंतर म्हणजेच १ जूनपासून जे शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जाताना आढळल्यास त्याचे स्वस्तधान्य, रेशन, घासलेट, श्रावण बाळ व निराधार पेन्शन, अनुदानित विहिरी तसेच सर्व शासकीय अनुदाने बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्याशिवाय, बेरोजगार तरुण/तरुणी शौचालय वापर करीत नसल्याचे आढळल्यास त्यांना नोकर भरतीत अपात्र घोषित केले जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला असून, ज्यांनी शासकीय अनुदाने घेतली; परंतु शौचालयाचा वापर करत नाहीत. त्यांचेवर खटले दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व निर्णयांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मालेगाव शहरातील नगरसेवक, शिक्षक सरकारी कर्मचारी नागरपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
उघड्यावर शौचवारी करणारे बेरोजगार नोकर भरतीसाठी अपात्र !
By admin | Published: May 15, 2017 7:12 PM