लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८-१९ मध्ये शासनाने सात क्रीडा प्रकारांना स्थगिती दिली असून संबंधित क्रीडा स्पर्धांचा कुठलाही विशेष फायदा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सदर क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत क्रीडा संघटनांकडून नकार मिळत असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.सन २०१८-१९ मध्ये स्थगिती दिलेल्या खेळ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावयाचे असल्यास शासनाच्या ३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या निर्णयानुसार व कार्यपद्धतीनुसार आष्टे डू आराखडा, युनिफाईट, माँटेक्सबॉल क्रिकेट, स्पीडबॉल, तांगसु डो, फिल्ड आर्चरी व कुडो या खेळांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, स्पर्धा आयोजनासाठी मनुष्यबळ, आर्थिक व तांत्रिक मदत मिळणार नाही. ५ टक्के आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोख परितोषिक अथवा इतर पुरस्कार व इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरिता खेळाडू आरक्षण आदी स्वरूपातील कुठलेही लाभ मिळणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे क्रीडा विभागाने आवाहन केल्यानंतरही जिल्ह्यातील संबंधित खेळांच्या संघटनांनी स्पर्धा आयोजनासंबंधी करावयाच्या कार्यवाहीबाबत कुठलाही विशेष रस दाखविला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत संघटनांकडून नकारघंटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 5:30 PM