वाशिम, दि. 14 - अलिकडच्या काळात किडीवर नियंत्रण ठेऊन पीक वाढीसाठी रासायनिक औषधांचा वापर सर्रास करण्यात येत असताना वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताडच्या शेतक-यांनी फवारणीसाठी वनस्पतीच्या पानांचा वापर करून नैसर्गिक किटकनाशक तयार केले आहे. या नैसर्गिक औषधामुळे पिकांवरील किडींचे नियंत्रण होते आहेच शिवाय पिकांची जोमाने वाढ होत असल्याने भरघोस उत्पन्नही मिळत असल्याचा दावा शेतक-यांनी केला आहे.
पार्डी ताड येथील शेतकरी मुरलीधर माचलकर आणि रामा गावंडे हे प्रगतशील शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पन्न घेतात. शेतीच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत नवे तंत्र विकसीत करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच महागडी आणि आरोग्यासह पिकांसाठीही घातक असलेली रासायनिक औषधांचा वापर टाळून नैसर्गिक पद्धतीने उत्पादन वाढ आणि कीड नियंत्रणासाठी त्यांनी अफलातून प्रयोग केला आहे. या शेतक-यांनी यासाठी विविध प्रकारच्या २१ वनस्पतींची पाने तोडून त्याचा अर्क तयार करत नैसर्गिक औषध तयार केले आहे.
त्यांनी कडूनिंब, रुई, निर्गुंडी, तरोटा, धोत्रा, तुळस, पपई, जांब, कारले, जास्वंद, डाळींब, पिंपळी, बाभूळ, अश्वगंध, शतावरी, शंखपुष्पी, गुळवेल, गाजरगवत, कोरफड, मिरची आणि जांभूळ आदी वनस्पतींची पाने वापरली आहेत. ही पाने पाण्यात काही काळ पाण्यात भिजवून ती खलबत्त्यात वाटून घेत वस्त्रगाळ लगदा तयार केल्यानंतर तो कापडातून पिळून काढला जातो आणि निघालेल्या अर्कात गोमूत्र आणि गावरान गायीचे शेण मिसळून पाण्याच्या टाकीत मिश्रण तयार केले जाते.
हा अर्क किटनाशक व टॉनिक म्हणून पिकांवर फवारला जातो. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरत आहे. या नैसर्गिक औषधामुळे शेतक-यांच्या पिकांची वाढ जोमाने होत आहेच शिवाय फुलधारणाही अधिक प्रमाणात होऊन किडीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य झाल्याचे दिसत आहे. हा अर्क तयार करण्यासाठी खर्च म्हणून दोन तीन महिलांची मजुरी त्यांना द्यावी लागली. अतिशय कमी खर्चाचा आणि प्रभावी असा हा अर्क तयार करण्यावर आता इतरही शेतकरी भर देत आहेत.