वाशिम : वाशिन नगरपरिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कोणीही कधीच न राबविलेला उपक्रम भाजपाचे नगरपरिषद उपाध्यक्ष बंटी उर्फ रुपेश वाघमारे यांनी राबवून सफाई कामगारांना दिवाळीची अनोखी भेट येथील महावीर भवनात दिली. यावेळी प्रथमचं या प्रकारे आपला सन्मान होत असल्याचे पाहून अनेक सफाई कामगारांना गहिवरले होते.
आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी भले पहाटे उठून शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी असलेल्या कामगार नेहमीच दुर्लक्षित राहला आहे. त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष सुध्दा गेले नाही. परंतु वाशिम नगरपरिषदेचे उपाध्यक्ष रुपेश वाघमारे यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगारांचा सन्मान व्हावा याकरिता पुढाकार घेवून कार्यक्रम राबविला. सफाई कामगारामधील महिलांना साडी, चोळीचे तर पुरुषांना कपडयांचे वाटप केले. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यावतीने सुध्दा दिवाळीचे फराळ व मिठाई वाटप केल्याने कर्मचाºयांना गहिवरुन आले होते.
या कार्यक्रमाला भाजपाचे जेष्ठ नेते मिठुलाल शर्मा, जेष्ठ कार्यकर्ते रामभाऊ देव, नगरसेविका करुणा कल्ले, नियोजन सभापती अमित मानकर, पाणी पुरवठा सभापती राहुल तुपसांडे, बापू ठाकुर, उत्तम पोटफोडे, मोहळे, आशुतोष निरखी, आनंद सोमाणी, भाजपा कार्यकर्ते ताजणे, हरीष लढ्ढा यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी काही सफाई कामगारांनी आपले मत व्यक्त केले तेव्हा त्यांचे मन गहिवरुन आल्याचे दिसून आले. नगरपरिषद उपाघ्यक्षांनी राबविलेला हा दिवाळीचा अनोखा उपक्रम म्हणजे आमच्याप्रती असलेले प्रेम होय. आजपर्यंत कुणाला जे सुचले नाही ते यांनी करुन दाखविल्याच्या प्रतिक्रीया सफाई कामगारांनी व्यक्त केल्यात. यावेळी आरोग्य निरिक्षक राजेश महाले यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.