वाशिम (संतोष वानखडे) : गत तीन, चार दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा आणि गारपिटीने शेतकऱ्यांना गारद केले. रविवारच्या (दि.९) अवकाळी पावसामुळे ७१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सोमवारी (दि.१०) महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्याला सुरूवातही झाली.
दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने कडक उन्हाचे मानले जातात. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच अवकाळी पाऊस, वादळवारा आणि गारपिट असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मार्च महिन्यातही १४ ते २० तारखेदरम्यान आणि ३१ मार्चला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर ६ व ८ एप्रिल रोजीदेखील अवकाळी पावसामुळे भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. रविवारी (दि.९) वाशिम तालुक्यासह मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड, कारंजा आदी भागात सायंकाळी ५.३० वाजतानंतर अवकाळी पाऊस झाला.
सोमवारी (दि.१०) सकाळीच महसूल विभागाने नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेतला असून, जवळपास ७१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला. यामध्ये वाढही होऊ शकते, असेही सांगण्यात आले.