संतोष वानखडे, वाशिम: जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गहू, हरभरा पिकाला दिलासा मिळाला तर तूर, कपाशी पिकाचे मात्र नुकसान झाले. जिल्ह्यात सरासरी ५०.५० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, रिसोड तालुक्यात सर्वाधिक ६३.४ मि.मी. पाऊस झाला.
मागील अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती. परतीचा पाऊस आला नसल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. प्रकल्पांत बऱ्यापैकी जलसाठा नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी हरभरा पेरणीला पसंती दिली. एखाद्या पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना रविवारी मध्यरात्री बरसलेल्या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला. वेचणीला आलेल्या कपाशीचे मात्र नुकसान झाले. काही प्रमाणात तूर पिकालाही फटका बसला. अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळात मात्र कपाशीबरोबरच रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याची मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.
कोणत्या तालुक्यात किती पाऊस?
तालुका / पाऊस (मि.मी.)
- वाशिम / ५५.८
- रिसोड / ६३.४
- मालेगाव / ५१.०
- मं.पीर / ५१.५
- मानोरा / ४६.०
- कारंजा / ३३.९
सहा मंडळात अतिवृष्टी
६५ मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी झाल्याचे मानले जाते. वाशिम तालुक्यातील अनसिंग मंडळात ६९.३ मि.मी., पार्डी आसरा ७० मि.मी., रिसोड तालुक्यातील रिसोड मंडळात ९४.३, भर जहाॅंगीर ८८.८, वाकद ७१.३ तर मालेगाव तालुक्यातील शिरपूर महसूल मंडळात ६६.३ मि.मी. पाऊस झाला.