वाशिम: मागील आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले, तर त्यानंतर पडलेल्या धुक्याने हरभऱ्याचे पीक जळून गेले. या प्रकारामुळे हाती काहीच येणार नसल्याने दोन शेतकरी बांधवांनी शेतातील १० एकर क्षेत्रातील हरभरा पिकावर नांगर फिरवून शेतच मोकळे केले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील शुभम नालिंदे आणि तरूण नालिंदे या युवा शेतकऱ्यांनी निराशेतून हा निर्णय घेतला.
खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची काढणी केल्यानंतर सोयाबीन हे पीक निघाल्यानंतर तरूण नालिंदे आणि शुभम नालिंदे या शेतकरी बंधूनी २६२ व २६४ या गट क्रमांकातील स्वत:च्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. हे पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच किन्हीराजा परिसरात मागील आठवड्यात जोरदार अवकाळी पावसासह गारपिटी झाली. यानंतर धुकेही पडले. या नैसर्गिक आपत्तीमुळे तरूण नालिंदे आणि शुभम नालिंदे या शेतकऱ्यांच्या शेतातील १० एकर क्षेत्रातील हरभऱ्याचे पीक पूर्णपणे पीक करपले. त्यामुळे यातून कोणतेच उत्पन्न मिळण्याची आशा उरली नाही. त्यामुळे निराश झालेल्या नालिंदे शेतकरी भावंडांनी या १० एकर क्षेत्रातील हरभरा पिकावर ५ डिसेंबर रोजी नांगर फिरवून शेतच मोकळे केले. या नुकसानापोटी प्रशासनाने शासनाकडून त्वरीत आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.